190 views
मुंबई दि.23 (प्रतिनिधी) मावळ तालुक्यातील वडीवळे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांचे बंदिस्तीकरण तसेच आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेला गती देण्यासाठी बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती.
*आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक*
वडीवळे धरणाच्या कालव्यांद्वारे सुमारे 4406 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. मात्र या उघड्या कालव्यांतून होणाऱ्या पाणी गळतीमुळे परिसरातील अनेक शेतजमिनी पाणथळ होऊन नापिकीस सामोऱ्या जात आहेत. त्यामुळे कालव्यांचे बंदिस्तीकरण करण्याची शेतकऱ्यांची दीर्घकालीन मागणी होती. यामुळे पाणीटंचाईवर मात करत सिंचनक्षेत्रात वाढ होणार आहे.
त्याचप्रमाणे आढले-डोणे परिसरातील कायमस्वरूपी पाणी समस्येच्या पार्श्वभूमीवर, पवना नदीवरून उपसा जलसिंचन योजना राबवण्याचीही शिफारस करण्यात आली. या योजनांसाठी आवश्यक विकास आराखडा (DPR) तात्काळ शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीस पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) जाधव, आमदार सुनील शेळके, जलसंपदा विभागाचे सचिव, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता तसेच इतर संबंधित अधिकारीही उपस्थित होते.
या निर्णयांमुळे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, दीर्घकालीन जलसिंचनाच्या दृष्टीने ही बैठक मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.