1729 views
वडगाव मावळ दि.14 (प्रतिनिधी) कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला भरभाव कंटेनरने चिरडून खून केल्याची घटना मंगळवारी (दि.13) रात्री 9:40 वा. वडगाव तळेगाव दाभाडे फाटा पुणे मुंबई महामार्गावर घडली. यातील चालक व क्लिनर वर गुन्ह्याचा गुन्हा दाखल केला आहे. मावळ न्यायालयाने दोन्ही आरोपींना दि.19 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली.
मिथुन वसंत धेंडे वय 44 रा. उरुळी कांचन पुणे सध्या वडगाव पोलीस स्टेशन ता.मावळ जि.पुणे अपघातात मृत्यू झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे.
रोहन इसब खान (वय 24, रा. सिंगार, पुनाना हिंदाना, जि. मेवात राज्य हरयाणा) उमर दिन मोहम्मद (वय 19, रा. बरसाना, मथुरा राज्य उत्तर प्रदेश) असे पोलीस हवालदाराचा खून केलेल्या चालक व क्लिनर आरोपींची नावे आहेत.
पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई बाजू कडून चाकणकडे जाणाऱ्या भरधाव HR 74 B 3677 क्रमांकाचा कंटेनर चालक रोहन इसब खान याने कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला जाणून बुजून चिरडून खून केला. कंटेनर चालक चाकण बाजूला वेगाने निघून गेला. कंटेनर चालक हा कार्ला फाटा येथून धोकादायक भरधाव वाहन चालवत असतानाचा, एका तरुणाने व्हिडिओ काढला. पोलिसांना माहिती दिली. पुणे ग्रामीण कंट्रोल वरून कंटेनर थांबविण्याचे आदेश झाल्याने कंटेनर थांबवत असताना, कंटेनर थांबविण्याचे नाटक करत भरभाव वेगाने वाहतूक पोलिसांना धेंडे यांना चिरडले. अपघातानंतर काही तासातच कंटेनर जप्त करून आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. आरोपी नशेच्या आहारी असल्याचे दिसत होते.
मावळ न्यायालयात बुधवारी (दि.14) दुपारी हजर केले असता, या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना दि.19 मे पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ट्रॅफिक वॉर्डन कुंडलिक पंढरीनाथ सुतार यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
पोलीस हवालदार मिथुन धेंडे यांच्यावर उरुळी कांचन पुणे येथे बुधवारी (दि.14) सकाळी 11:30 अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस निरीक्षक कुमार कदम आदींसह पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार बहुसंख्येने उपस्थित होते.
मिथुन धेंडे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांचा 6 वर्षाचा मुलगा त्याच्या आईचा हात धरून ओढत आईला म्हणाला आपल्या बाबा साठी किती लोक आले आहेत असे बोलतच उपस्थित लोकांचे डोळे पाणावले. धेंडे यांच्या कुटुंबाचा आधार गेला असून त्यांना पत्नीला पोलीस प्रशासनाने त्वरीत नोकरी द्यावी. तसेच त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी. मितभाषी, सुस्वभावी, कायमच मदतीची भावना असणारे कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार मिथुन धेंडे यांच्या मृत्यूने पुणे ग्रामीण पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. धेंडे यांनी लोणावळा, कामशेत व वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये नोकरी केली असल्याने सर्वसामान्य नागरिकांसोबत जनसंपर्क होता.
या गुन्ह्याचा तपास वडगाव मावळ पोलीस करत आहे.