*अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून मावळात देशी वृक्षलागवडीचा उपक्रम; आमदार सुनील शेळके यांच्या निवासस्थानी बैठक*

314 views

तळेगाव दाभाडे दि.3 (प्रतिनिधी) ‘सह्याद्री देवराई’ संस्थापक अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यात जैवविविधतेसाठी देशी वृक्षलागवडीचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या तयारीसाठी आमदार सुनील शेळके यांच्या निवासस्थानी सोमवारी (दि.2) विशेष बैठक संपन्न झाली.


Author : Admin
Publisher : admin
Update : 3 months ago
Date : Tue Jun 03 2025

image



या बैठकीला सयाजी शिंदे यांच्यासह मावळ तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सोमटणे, गहुंजे, इंदोरी, टाकवे बुद्रुक आणि अन्य वनक्षेत्रांमध्ये सह्याद्री देवराईच्या सहकार्याने स्थानिक देशी वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर हा काळ वृक्षारोपणासाठी अतिशय अनुकूल मानला जातो. नैसर्गिक पाणी उपलब्ध असल्याने नवीन रोपे लवकर रुजतात आणि परिसरातील वनस्पती व प्राण्यांची जैवविविधता वाढीस लागते. यामुळे ऑक्सिजन निर्मितीत वाढ होईल आणि वन्यजीवांचे संवर्धन होण्यास हातभार लागेल.


या उपक्रमातून पर्यावरण रक्षण, हरित महाराष्ट्र आणि शाश्वत विकास यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. या संपूर्ण मोहिमेबाबत आमदार शेळके म्हणाले, “पर्यावरणाविषयीची आपली संवेदनशीलता लक्षात घेता, हा उपक्रम मावळच्या निसर्गसौंदर्यात भर घालणारा ठरेल, याचा मला अभिमान आहे.”

याप्रसंगी, वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे, शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले, उद्योजक विलास काळोखे, वनपाल, वनरक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.




लेटेस्ट अपडेट्स