706 views
पुणे दि.19 (प्रतिनिधी) प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर व त्यांच्या वडिलावर कठोर कारवाई होण्याबाबत महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच तलाठी संघाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विभागीय आयुक्त पुणे यांना गुरुवारी (दि.18) लेखी निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात असे नमूद आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांनी त्यांच्या कालावधीत अत्यंत उद्दामपणाचे वर्तन केले असून कोणत्याही प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याला शोभणारे नाही. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याला केबिन, गाडी, निवास, स्वतंत्र शिपाई सुविधा पुरविण्यात येत नसताना, त्यांनी आग्रह धरून जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्माचाऱ्यांशी संपर्क करून जबरदस्तीने अशा सुविधा प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वडिलांनी देखील तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याला दम देऊन वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबरचा ताबा घेऊन पूजा खेडकर यांनी स्वतंत्र केबिन तयार केली.
प्रशिक्षणार्थी अधिकारी यांच्या वडीलांनी येऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना दमदाटी करुन कार्यालयातील वातावरण बिघडविलेबद्दल त्यांचेविरुद्ध कठोर कारवाई करा.
पुजा खेडकर यांच्या बाबतीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राच्या आधारे अन्य पात्र उमेदवारांचा हक्क डावलून भा.प्र.स अधिकारी पद मिळविले याचा संघटनेच्या वतीने निषेध करतो.
पुजा खेडकर यांच्या वडीलांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केलेली दमदाटी तसेच पुजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्यावर, महिला असलेया फायदा घेऊन स्वतःचा छळ केलेबाबतची केलेली खोटी तक्रार याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
वरिष्ठ अधिका-यांवर घाणेरडे आरोप करुन एकूणच जिल्हा प्रशासनाची प्रतिमा मलिन करणेची बाब खपवून घेतली जाणार नाही.
आम्ही सर्वजण जिल्हाधिकारी पुणे सुहास दिवसे यांच्या पाठीशी आहोत. जिल्हाधिकारी दिवसे अत्यंत चांगले अधिकारी असून त्यांना आम्ही 25 ते 26 वर्षांपासून ओळखत आहोत. आजपर्यंत त्यांनी कधीही कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी यांचेशी कसल्याही प्रकारचे गैरवर्तन केलेले नाही. तसेच त्यांनी गैरवर्तन केलेबाबत आजपर्यंत कोणत्याही महिला अधिकारी / कर्मचारी यांचेकडून कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही.
तरी जिल्हाधिकारी पुणे यांचेवर खोटे आरोप करणाऱ्या व अनेक बाबींत दोषी आढळून येणाऱ्या पुजा खेडकर व त्यांच्या वडीलांवर तातडीने कठोर कारवाई करणेत यावी. अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघ उपाध्यक्ष बजरंग मेकाले,
पुणे जिल्हा तलाठी संघ जिल्हाध्यक्ष सुधीर तेलंग, सरचिटणीस सुधीर गिरमे, उपाध्यक्ष चांदपाशा तांबोळी, राहुल पाटील, सचिन चव्हाण, प्रमोद लोखंडे, वैशाली कोळेकर, पवनकुमार शिवले, योगेश थिटे, रवी मताळे, रविराज मैंद, दिनेश कपले, ए बी मोडक व वि. ज्ञा बेंडभर आदींनी निदेवन दिले.