475 views
तळेगाव दाभाडे दि.12 (प्रतिनिधी) शहरातून जाणाऱ्या तळेगाव दाभाडे चाकण महामार्गावर सकाळी 7 ते दुपारी 2 तसेच सायंकाळी 4 ते रात्री 7 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी असून त्याचे परिपत्रक देखील प्रसिद्ध झाले आहे. सदर बाबत अवजड वाहनांना प्रवेश न देणे हे संबंधित अधिकाऱ्यांना बंधनकारक असून, अवजड वाहनांच्या बंदी काळात जीवित हानी झाल्यास त्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यावर सदोष मनुष्य वधाचा खटला चालवावा अशी मागणी तळेगाव दाभाडे कृती समितीने केली आहे.
सदर बंदीच्या काळामध्ये अनेक महिला वर्ग आपापल्या कामासाठी टू व्हीलर व पायी तळेगाव दाभाडे शहरांमध्ये फिरताना आढळून येतात आपल्या पाल्यांना शाळेतून ने-आन करताना देखील मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सक्रिय आहे. अशातच अवजड वाहनांची धडक बसल्याने जास्तीत जास्त महिलांचा अपघाती मृत्यू तळेगाव दाभाडे चाकण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाल्याचे आढळून आले आहे.
अवजड वाहनांना पूर्णतः बंदी काळामध्ये प्रवेश बंदी करण्यात यावी यासाठी सर्व पक्ष कृती समितीने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदन दिले असून अवजड वाहनांचे बंदी काळामध्ये धडक बसून निष्पाप नागरिकांचा जर मृत्यू झाला तर त्यास संबंधित अधिकारी जबाबदार असून अशा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तळेगाव दाभाडे सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. माजी नगरसेवक अरुण माने मिलिंद अच्युत कल्पेश भगत नितीन फाकटकर नितीन जांभळे मुन्ना मोरे आदी सामाजिक कार्यकर्ते याबाबतीत पाठपुरावा करणार असल्याचे कल्पेश भगत यांनी नमूद केले.