515 views
पिंपरी दि.18 (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य विजयी संकल्प मेळाव्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. परवा म्हणजेच येत्या शनिवारी दि. 20 जुलै 2024 रोजी शहराच्या मध्यवर्ती भागात नवमहाराष्ट्र महाविद्यालय पिंपरीगाव या ठिकाणी सायंकाळी ठीक 4.00 वाजता या भव्य विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन केले असून पावसाळ्याच्या दिवसांमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कार्यक्रमस्थळी भव्य असा वॉटरप्रूफ सभामंडप उभारण्यात आला आहे, शिवाय 12 ते 15 हजार नागरिकांच्या बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
तुषार कामठे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मायबाप जनतेच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे दहापैकी तब्बल आठ खासदार संसदेत खासदार म्हणून निवडून आले, त्यानंतर आदरणीय शरद पवार साहेब प्रथमच पिंपरी चिंचवड शहरात अशा भव्य कार्यक्रमासाठी येत आहेत. आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत या कार्यक्रमात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी, पिंपरी व चिंचवड या तीनही विधानसभांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडून येतील असा विजयी संकल्प करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचे शिल्पकार म्हणून सर्वश्रुत असणाऱ्या आदरणीय शरद पवार साहेबांनी गेल्या पन्नास वर्षांच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी दुरदृष्टीय धोरणात्मक निर्णय घेतले आहेत, या सर्व कार्यकाळात शहरातील कित्येक पितृतुल्य ज्येष्ठ मान्यवरांची शरद पवार साहेबांना भक्कम साथ लाभली, अशा शरद पवार साहेबांच्या सर्व जुन्या सहकाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. दुर्दैवाने आज हयात नाहीत अशा ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या स्मृतिगंध स्वरूपी आठवणींनाही यावेळी उजाळा देण्यात येईल. त्याचबरोबर नवनिर्वाचित आठ खासदारांचाही सन्मान यावेळी केला जाणार आहे.
देशाला वाचविण्यासाठी तसेच संविधान रक्षण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रभर निर्भय बनो चळवळीच्या माध्यमातून जनजागृती करून मोलाचे योगदान देणारे मा. ऍड. असीम सरोदे, मा. विश्वंभर चौधरी, वरिष्ठ पत्रकार संजयजी आवटे या मान्यवरांचाही यावेळी सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती तुषार कामठे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी एमआयएम पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले.
आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेश प्रवक्ते रविकांतजी वर्पे, प्रदेश युवक सरचिटणीस प्रशांत सपकाळ, पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर, नव्यानेच पक्षात प्रवेश घेतलेले मा. नगरसेवक अजित गव्हाणे, पंकज भालेकर, धनंजय भालेकर यांच्यासह विनायक रणसुभे, उपाध्यक्ष दिलीप पानसरे, उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, विशाल भाई जाधव, राजरत्न शिलवंत, सचिन गायकवाड, पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.