460 views
तळेगाव दाभाडे दि.6 (प्रतिनिधी) औद्योगिक क्षेत्रातील असलेल्या नवलाख उंब्रे हद्दीतील डोंगरावर सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या चौघांवर मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि.६ मे) सकाळी घडली.
हनुमंत बबूशा कोयते (44) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दत्ता कडलक, लक्ष्मण कदम, एकनाथ धायबर (सर्व रा. नवलाख उंबरे, ता. मावळ) अशी जखमींची नावे आहेत.
तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवलाख उंब्रे हद्दीतील डोंगरावर दररोज स्थानिक नागरिक मॉर्निंग वॉक सकाळी फिरण्यासाठी जातात. मंगळवारी सकाळी हनुमंत कोयते, दत्ता कडलक, लक्ष्मण कदम, एकनाथ धायबर हे चौघेजण मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. डोंगर चढत असताना डोंगरमधील तामकडा येथे अचानक चौघांवर मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात हनुमंत कोयते यांचा मृत्यू झाला. तर तिघेजण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मावळ तालुक्यात दिवसेंदिवस मोठ्या आकाराचे वृक्ष जीर्ण तसेच त्यांची तोड झाल्याने मधमाश्यांचे पोळे हे मावळातील उंच इमारतीला तसेच डोंगर कड्याला बसतात. त्यात मानवी हस्तपेक्ष झाल्यावर मधमाश्यांचा हल्ला नागरिकांवर होतो. एकविरा देवीच्या डोंगरावर असा प्रकार घडला होता. नवलाख उंब्रे हद्दीतील घटनेत एका व्यक्तीचा जीव गेल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.