210 views
वडगाव मावळ दि.13 (प्रतिनिधी) अध्यात्म आणि भक्तीच्या प्रवाहात न्हालेल्या वडगाव मावळमध्ये मुमुक्षु शिवम संदीपजी बाफना यांच्या केशर छाटणेच्या विधीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शुक्रवारी श्रमण संघीय युवाचार्य महेंद्र ऋषिजी महाराज, मालवा प्रवर्तक प्रकाश मुनिजी, उपप्रवर्तक अक्षय ऋषिजी, बरसादाता गौतम मुनिजी आणि शेकडो साधु-साध्वी तसेच हजारो श्रावक-श्राविकांच्या उपस्थितीत हा पवित्र सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी युवाचार्य महेंद्र ऋषिजी महाराज यांनी मुमुक्षु शिवम संदीपजी बाफना यांना आशीर्वाद देताना सांगितले की, "जिनशासनाची सेवा आणि गुरूंच्या चरणांमध्ये समर्पित होण्याची ही विधी समाजाला नवी दिशा देईल." प्रवर्तक प्रकाश मुनिजी म्हणाले की, "केशराचे महत्त्व केवळ आध्यात्मिकच नाही, तर सामाजिक एकोप्या आणि सकारात्मक बदलाचा संदेश देणारे आहे. हे जीवनात नवी ऊर्जा निर्माण करत समाजाला एकतेच्या सूत्रात बांधते."
यू
अनुष्ठान आराधिका कुमुदलता प्रखरजी, वक्ता अर्जना जी, आणि साध्वी अनंत ज्योतिजी यांनी यावेळी समाजाला मार्गदर्शन करत सांगितले की, "आधुनिक समाजात केशराच्या रंगाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. आपल्या परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपत आत्मविकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यामुळेच आत्म्याचा कल्याण साध्य होईल."
केशर छाटण्यापूर्वी दीक्षार्थी शिवम बाफना यांचा भव्य वरघोडा काढण्यात आला, ज्यामध्ये वडगाव मावळच्या जैन समाजासह देशभरातून आलेल्या शेकडो श्रावक-श्राविकांनी भाग घेतला आणि शिवम संदीपजी बाफना यांचे स्वागत केले.
हितेंद्र ऋषिजी महाराज यांनी सांगितले की, शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा पासून वडगाव मावळमध्ये भव्य सोहळा आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रमण संघीय युवाचार्य महेंद्र ऋषिजी महाराज, १०० हून अधिक साधु-साध्वींच्या सान्निध्यात शिवम संदीपजी बाफना यांना दीक्षा प्रदान करणार आहेत.
श्री जैन स्थानकवासी श्रावक संघ, युथ ग्रुप , महिला मंडळ , पाठशाळा ग्रुप वडगाव मावळ यांनी नियोजन केले.